संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने गेल्या वर्षी प्रकाशित केलेल्या ओझोनविषयक जागृती करणाऱ्या शैक्षणिक संचाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन येत्या पाच सप्टेंबरला होणार आहे.
पृथ्वीभोवतालच्या वातावरणात असलेला ओझोन वायूचा थर सूर्यापासून उत्पन्न होणाऱ्या अतिनिलकिरणांना शोषून घेतो व त्यांच्यापासून उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या दुष्परिणामांपासून
पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण करतो. परंतु कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफ्लुरोकार्बन यांच्या उत्सर्जनामुळे ओझोनचा थर हळूहळू विरळ होत चालला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या परिक्षणानुसार प्रतिवर्षी सुमारे वीस ते तीस लाख लोक कॅन्सरपिडीत होत आहेत. तर साधारणातः दीड कोटी लोकांना मोतीबिंदुमुळे अंधत्व येत आहे. यातील सुमारे वीस टक्के आजार हे सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे होत आहेत.
ओझोनच्या कवचांची होणारी हानी, तसेच अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या उत्सर्गातून होणारे दुष्परिणाम याची जाणीव ‘शालेय विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी या शैक्षणिक संचाची निर्मिती केली गेली आहे. मूळ फ्रेंचमध्ये असलेल्या या संचाचे भाषांतर मराठी, हिंदी, बंगाली व उर्दू या चार भाषांमध्ये करण्यात आले आहे. हेमंत आपटे यांनी मराठीत भाषांतर केले आहे. या ‘संचात अंतर्भूत असणारी एक नाटिका संयुक्त राष्ट्रसंघाच्या ओझोन कृती समितीचे प्रमुख डॉ. राजेंद्र शेंडे यांनी लिहिली आहे.
विद्यार्थीवर्गामध्ये पर्यावरणाबद्दल आवड आणि जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाने “ओझी ओझोन’ या कार्टून फिल्मची देखील निर्मिती करण्यात आली आहे. अशी माहिती यो कार्यक्रमाच्या शैक्षणिक संचविषयक सल्लागार विनिता आपटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या शैक्षणिक संचाचे प्रकाशन पाच सप्टेंबरला महापौर राजलक्ष्मी भोसले यांच्या हस्ते होणार आहे. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाचे सचिव डॉ. बद्री नीलरत्न व संयुक्त राष्ट्रसंघाच्या बँकाँक येथील शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रादेशिक समन्वयक अतुल बंगाई हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.